जिवंत होण्याच्या आशेवर मृतदेह दहा दिवस चर्चमध्ये!

अंबरनाथ,दि.६(वार्ताहर)-मुंबईतील मृत्यू पावलेल्या तरुणाला जिवंत करण्यासाठी नागपाडा आणि नंतर अंबरनाथमधील चर्चमध्ये तब्बल दहा दिवस प्रार्थना करण्यात आली. काल रात्री पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी कुटुंबियांची समजूत काढत मृतदेह बाहेर काढला. मुंबईच्या चिंचपोकळी येथे राहणारा मिशाख नेव्हीस्हा तरुनाचा कर्करोगाने २७ ऑक्टोंबरला मृत्यू झाला होता. त्याचे वडील हे मुंबईच्या नागपाडा येथील जीजस फॉर ऑल नेशन्स चर्चचे बिशप आहेत. तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने वडीलांनी त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न सुरु केला. नागपाडा येथील चर्चमध्ये मिशाख याला २७ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आले. चर्चमध्ये प्रार्थना केल्यावर जिजस त्याच्यामध्ये पुन्हा प्राण टाकेल अशी श्रध्दा त्यांची होती. नऊ दिवस चर्चमध्ये ठेवल्यावर त्याची चर्चा नागपाडा भागात झाल्यावर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. या तरुणावर अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या. मात्र मिशाख यांच्या कुटुंबियांनी प्रार्थना सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. नागपाडा येथे चर्चा झाल्याने त्यांनी हा मृतदेह थेट अंबरनाथ येथील जीजस फॉर ऑल नेशन्स चर्चमध्ये आणले. ५ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजता पुन्हा अंबरनाथच्या चर्चमध्ये प्रार्थना सुरु करण्यात आली. दिवसभर या तरुणाला जिवंत करण्याचे प्रयत्न बिशप यांनी केले. त्यांच्यासोबत त्या मुलाचे कुटुंबिय देखील होते. रात्री उशिरा या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच अंबरनाथ पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करुन त्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला दिला. मिशाख या तरुणाला अंबरनाथच्या चर्चेमध्ये आणल्याची माहिती नागपाडा पोलिसांना देखील देण्यात आली आहे. त्यामुळे या तरुणाच्या बाबतीत त्याचे कुटुंबिय काय निर्णय घेतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अंबरनाथहून हा मृतदेह चिंचपोकळी येथे त्याच्या राहत्या घरी नेण्यात आला आहे. मिशाख या तरुणाला अंबरनाथच्या ज्या चर्चमध्ये आणण्यात आले होते ते चर्च अंबरनाथच्या नारायण चित्रपटगृहात सुरु करण्यात आले आहे. या प्रकारामुळे आता चर्चच्या अडचणीत वाढ झालेली असून अंधश्रध्दा प्रकरणात चर्चवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणात नागपाडा पोलिसांसोबत चर्चा करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहेत.