जिल्ह्यात ६५ टक्के मतदान; भिवंडीत सेना-भाजपात राडा

ठाणे,दि.१३(वार्ताहर)-ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ५ तालुक्यातील ९३७ मतदान केंद्रांवर आज मतदान पार पडले. जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५२.६५ टक्के मतदान झाले होते. संध्याकाळपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाल्याचे कळते. भिवंडीत सेना-भाजपात धुमश्‍चक्री उडाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ जागा असून त्यातील खोणी गटातील निवडणूक बिनविरोध झाल्याने आज जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी तर पंचायत समित्यांच्या १०६ गणांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झाले. या निवडणुकीत शहापूर आणि भिवंडी हे तालुके महत्वाची भूमिका निभावणार असल्याने सर्व पक्षांनी त्यांची ताकद पणाला लावली होती. जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या क्षेत्रात एकूण सात लाख तीन हजार ३७८ मतदार आहेत. त्यात तीन लाख २५ हजार ९३२ महिला तर तीन लाख ७७ हजार ४४४ पुरूष आणि दोन इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी १५२ उमेदवार तर पंचायत समित्यांच्या १०६ जागांसाठी २९७ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. आज दिवसभर मतदारांचा उत्साह वाढतच होता. जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ वादाच्या ठिणग्या उडाल्या तर भिवंडीत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमधे जोरदार हाणामारी झाली. काल्हेर गावात एक कार्यकर्ता वारंवार मतदान केंद्रात ये-जा करीत असताना विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्याला हटकले असता त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची होऊन ते एकमेकांना मारहाण करून लागले. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना हे समजल्यानंतर सर्वांनी घटनास्थळी धाव घेतल्याने तणाव निर्माण होऊन जोरदार धुमश्‍चकी उडाली. हस्तक्षेप करूनही कार्यकर्ते ऐकत नाहीत असे लक्षात आल्यानंतर पोलीसांनी सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. दरम्यान तालुक्यातील काही मतदान केंद्रावर अशाच किरकोळ घटना घडल्या आहेत. आज जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच उपजिल्हाधिकारी जीवन गलांडे आणि सामान्य प्रशासन निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. प्रशासनाची चोख व्यवस्था संपूर्ण मतदान प्रक्रियेवर आज तीनही निवडणूक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी सातत्याने लक्ष ठेऊन होते व राज्य निवडणूक आयोगास अहवाल पाठवीत होते. जिल्ह्यातील १७ पोलीस ठाण्यांमध्ये निवडणूक विषयक संपर्क पोलीस अधिकारी ठाणे ग्रामीण पोलिसांनी नेमले होते त्यांचेही परिस्थितीवर बारीक लक्ष होते. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई असे एकूण पाच हजार १९० कर्मचारी या प्रक्रियेत होते. ३० नोव्हेंबरपासून दोन टप्प्यात या सर्वाना प्रशिक्षण देण्यात आले होते. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे यासंदर्भात निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती. शिवाय निवडणूक काळात एकूण ४४९ हत्यार परवाना धारकांची शस्त्रे जमा करून घेण्यात आली होती. हजारावर झेंडे, पोस्टर्स, काढून टाकण्यात आले होते. १९ एसएसटी पथक, १८ भरारी पथके, तसेच व्हिडीओ देखरेख पथके यामुळे निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग करणार्‍यांवर वचक राहिला.