जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीला न्यूमोनिया

ठाणे,दि.१३(वार्ताहर)-ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असून सध्या फक्त २२ रक्त पिशव्या रुग्णालयाकडे शिल्लक आहेत. संपूर्ण जिल्ह्यातून रोज शेकडो रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. दुर्दैवाने मोठा अपघात घडून मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासली तर रुग्णालयावर गंभीर स्थिती ओढवू शकते म्हणून प्रशासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्त साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. वर्षभरात तीन हजार ६३८ पिशव्या रक्तदान झाले होते त्यातून वर्षाअखेरपर्यंत तीन हजार ६१६ पिशव्या रक्त वापरले गेले असून २२ पिशव्या रक्तच रुग्णालयाकडे जमा आहे. हे रक्त खूप कमी असून दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत असतात. अचानक रक्त लागल्यास अपुर्‍या रक्तसाठ्यामुळे रुग्णांचे हाल होऊ शकतात. सिव्हिल हॉस्पिटल हे ठाणे जिल्ह्यातील मोठे रुग्णालय आहे. येथे ग्रामीण आणि शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येत असतात. रक्तांचा तुटवडा असल्याने महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी विलंब लागत आहे. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने शस्त्रक्रिया करता येत नाही. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना रक्ताची गरज असते. शस्त्रक्रियेस हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य गरजेचे असते. सिव्हील रुग्णालयात वर्षभरात १९२९ मोठ्या शस्त्रक्रिया आणि ४४९२ लहान शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. याचसोबत ९७३ सिझर डिलेव्हरी करण्ययात आल्या आहेत. या सर्व रुग्णांना कमी अधिक प्रमणात रक्ताची गरज भासत असेत त्यांमुळे सिव्हिलमधील रक्तपुरवठा कमी पडत असल्याचे लक्षात येते. फेब्रुवारी महिन्यात ४९१ बाटल्या रक्त जमा झाले होते त्यातील महिना अखेरपर्यंत ३९० रक्त बाटल्या वापरल्या गेल्या होत्या. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता डॉ. ढोणे यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात जुन्या इमारतीत पहिल्या मजल्यावर होणार आहे. हे शिबिर सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरु असणार आहे. जयंती निमित्त मोठया संख्येने नागरिक जमा होतात. त्यामुळे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या नात्याने इच्छुक नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा असे जाहीर आवाहन डॉ. ढोणे यांनी केले आहे. नागरिकांनी केलेल्या रक्तदानामुळे अनेक गरजु रुग्णांना जिवनदान मिळणार आहे. इच्छुक व्यक्तिंनी डॉ. ढोणे यांच्याशी ८०८२३३१७२५ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिव्हील रुग्णालयात इतर दिवशी २४ तास रक्तपेढी सुरु असते कोणत्याही वेळी जाऊन रक्तदान केले जाऊ शकते.