खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते बदलापुरात शववाहिनीचे लोकार्पण

बदलापूर,दि.२२(वार्ताहर)-भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या खासदार निधीतून कुळगाव-बदलापूर नगरपालिकेला देण्यात आलेल्या शववाहिनीचे आज लोकार्पण करण्यात आले. सुमारे ११ लाख रुपयांची ही शववाहिनी आजपासून गरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाली. खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम झाला. या वेळी भाजपचे आमदार किसन कथोरे, नगराध्यक्ष वामन म्हात्रे, उपनगराध्यक्ष शरद तेली, भाजपचे गटनेते राजन घोरपडे, शहराध्यक्ष संभाजी शिंदे, मुख्याधिकारी देविदास पवार आदी उपस्थित होते. बदलापूर शहराचा वेगाने विकास होत आहे. ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर म्हणून बदलापूरची वाटचाल सुरू आहे. अशा वेळी नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन विकास करावा. त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावेत. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून निधी मिळवून बदलापूरचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी दिली.