खापरी शाळा पडू लागली ओस

मुरबाड,दि.13(वार्ताहर)-तालुक्यातील खापरी शाळेची इमारत मोडकळीस आली असून शाळेला जाणारा रस्ताही नाही. विशेष म्हणजे या शाळेच्या काही अंतरावरच दोन शाळा सुरू झाल्याने खापरी शाळेतून दाखल घेऊन विद्यार्थी दुसर्‍या शाळेचा रस्ता धरू लागले आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खापरी, टोकावडे केंद्र शाळेनंतर दुसर्‍या नंबरची शाळा, इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत १३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आगोदर दोनशेच्या आसपास विध्यार्थ्यी या शाळेत असायचे. परंतु सरकार बदलले की कायदे बदलले जातात. असाच कायदा शासनाने करून एक किमीच्या आत शाळा, आदिवासी वाड्या-पाड्यावर वस्तीशाळा, रानोमाळ शाळा काढल्या. त्यामुळे जास्त पटसंख्येच्या शाळांचे पट कमी झाले. मात्र त्यामुळे शिक्षक कमी केले गेले. याचा परीणाम शिक्षणावर झाला. अशीच अवस्था खापरी शाळेची झाली आहे. या शाळेच्या दोनशे मिटरवर कामतपाडा शाळा आणि एक किमीवर वैतागवाडी येथे वस्ती शाळा काढून, शासनाच्या चुकीच्या धोरणाने खापरी शाळेची वाताहात झाली. आज या शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत १३० विध्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. मात्र केवळ एकच इमारत सुस्थीत असून जुन्या पाच इमारती मोडकळीस आलेल्या असल्याने, शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा प्रशासनाकडे या खोल्या पाडून, नवीन इमारतीची मागणी केली आहे. मात्र या मागणीला केराची टोपली दाखवून तालुक्यातील सुस्थितीतील इतर इमारती पाडण्यास परवानगी दिली आहे. इमारतीप्रमाणेच शाळेत येण्या-जाण्यासाठी रस्ता नसल्याने आणि रस्त्याची मागणी गेल्या दोन वर्षापासून बांधकाम विभागाकडे करून देखील रस्ता होत नाही. एक नावारुपास आलेल्या शाळेला मोडकळीस आलेली इमारत आणि चाळण झालेला रस्ता या दुर्दशेला वैतागून अनेक विद्यार्थी आपले दाखले घेऊन इतरत्र शिक्षणासाठी गेल्याचे वास्तव समोर आले आहे.