खड्ड्यात गेले रस्ते; दुरून डाबंर साजरे!

ठाणे, दि.11-शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण होऊन सर्वत्र खड्डेच खड्डे दिसू लागले आहेत. हे खड्डे चुकवताना वाहनचालक आणि पादचार्‍यांना जीव मुठीत घ्यावा लागतो. मात्र पावसाने उघडीप घेतल्यानंतरच तीन वर्षाची हमी देणार्‍या विकसीत डांबराने हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू होणार आहे. तोपर्यंत ठाणेकरांचा प्रवास नशिबावरच अवलंबून राहणार आहे. जूनमध्ये जेमतेम पडलेल्या पावसाने जुलैमध्ये जोर धरला. मुसळधार पावसामुळे शहरातील डांबरी रस्ते, नेहमीप्रमाणे उखडून लहान मोठे खड्डे पडले आहेत. काही खड्डे मोठ्या रस्त्यांवर असून वर्दळीमुळे येथे अपघातांची दाट शक्यता आहे. खड्डे चुकवताना कल्याणात मागील काही दिवसांत वाहनांचे अपघात होऊन तिघांचे बळी गेले आहेत. ठाण्यातही अशा घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्यांवरून चालणे किंवा वाहन हाकणे जीवावर बेतू शकते. शिवाय खड्ड्यात पाणी साचल्याने त्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता आणखी बळावली आहे. सर्वाधिक वर्दळीचा घोडबंदर रस्ता, माजिवडा नाका, इंदिरानगर ते नितीन कंपनी रस्ता, दोस्ती रेंटल समोरील रस्ता, चरई या रस्त्यांसह शहरातील कोपरी, कळवा, मुंब्रा आदी भागातील सर्व डांबरी रस्ते खड्ड्यात गेल्याने ठाणेकर शिव्याशाप देत ओहत. हे खड्डे बुजवण्यासाठी रसायन मिश्रित डांबराचा वापर करण्यात येणार असून तीन वर्षांची हमी देण्यात आली आहे. मात्र हे खड्डे बुजवणार कधी? अपघात होऊन जिवितहानी झाल्यानंतर इलाज नको असे जागरूक ठाणेकर म्हणत आहेत. या खड्ड्यांबाबत जागर फाऊंडेशन या संस्थेने सोशल मीडियावर जनजागृती सुरू केली असून शेकडो नेटीझन्सच्या लाईक्स मिळत आहेत. याबाबत नगर अभियंता अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पावसाने उघडीप दिल्यानंतरच खड्डे बुजवण्याचे काम सुरू होईल असे सांगितले. नव्याने विकसित केलेले केमिकल डांबर कमी प्रमाणात उपलब्ध आहे. याची निर्मिती करून सेवा देणार्‍या कंपन्याही नगण्य आहेत. तसेच सध्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्याचा निचरा झाल्यावर आणि उघडीप मिळाल्यानंतरच डांबराने खड्डे भरता येतील असे श्री. पाटील यांनी सांगितले. या डांबरांची तीन वर्षांची हमी असली तरी पाऊस थांबेपर्यंत ठाणेकरांना धोकादायक खड्ड्यांशी सामना करावा लागणार आहे.