कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मांडली स्वतंत्र चूल

भाईंदर,दि.५(वार्ताहर)-राष्ट्रवादीत सक्षम नेतृत्वाचा अभाव निर्माण झाल्याने कॉंग्रेसने येत्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी न करता सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसवासियांनी एकूण ९५ जागांपैकी १७ जागांवर दावेदारी केली असुन त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालिका निवडणूक येत्या ऑगस्टमध्ये पार पडणार असल्या तरी मतदार याद्यांतील घोळ निस्तरण्यास २० जुलैचा दिवस उजाडणार आहे. प्रत्यक्षात निवडणुकीचा कालावधी ४५ दिवसांचा असला तरी आचारसंहिता लागु करण्याचा आदेश अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना राजकीय डावपेच आखण्यासाठी उसंत मिळाली आहे. त्यात कॉंग्रेसने इच्छुकांसह निवडणुकीतील मोर्चेबांधणीसाठी जोरबैठकांना सुरुवात केली आहे. तत्पुर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील कुरघोडींसह वरीष्ठांच्या असहकार्याला कंटाळुन पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी पदाचा राजीनामा देत आपल्या समर्थकांसह कॉंग्रेसच्या हातात हात दिला. दरम्यान पाटील यांचे नेतृत्वच मान्य नसल्याची ओरड राष्ट्रवादीतील उपर्‍यांनी सुरु केली. स्थानिक पातळीवर एकही पद नसलेल्यांनी आम्ही राष्ट्रवादीचे निष्ठावंत असल्याची गरळही ओकण्यास सुरुवात केली. अशा या गटबाजीत अखेर राष्ट्रवादी नेतृत्वहिन झाली. त्यामुळे राष्ट्रवादी यंदाच्या निवडणुकीत पुर्ण सक्षमतेने उतरणार का, हा सामान्य मतदारांचा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे. तरी देखील तत्कालिन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने मरगळ आलेली राष्ट्रवादी पुन्हा उभी राहिल, असा आत्मविेशास काही निष्ठावंतांकडून (?) व्यक्त केला जात आहे. जिल्हाध्यक्षपदावर असलेल्या पाटील यांच्या कार्यकाळात राष्ट्रवादीच्या सुमारे ४० ते ५० पदाधिकार्‍यानी उमेदवारीसाठी दावा केला होता. कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत त्यांनी १७ जागांवर दावा केला आहे. कॉंग्रेसमध्ये दाखल होण्यापुर्वी आघाडीच्या वल्गना दोन्ही पक्षांच्या उभयतांकडुन करण्यात येत होत्या. त्यात कॉंग्रेसने मात्र सावध पावित्रा घेत सक्षम उमेदवारांच्या यादींची मागणी पक्षाकडे केली होती. ती यादी अद्याप कॉंग्रेसला मिळालेली नाही. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा वाद यंदा मोडीत निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उरल्यासुरल्या राष्ट्रवादीला सक्षम नेतृत्वच नसल्याने आघाडी करणार कशी, असा प्रश्न कॉंग्रेसला पडला आहे. त्यामुळे आघाडीची शक्यता मावळली असली तरी राष्ट्रवादीतुन कॉंग्रेसमध्ये विलिन झालेल्यांनी मात्र कॉंग्रेसला बहुमताने विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी दावेदार उमेदवारांची त्या-त्या प्रभागातील सक्षमता तपाण्यास सुरुवात देखील करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मीरा-भाईंदर शहर (जिल्हा) कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत : राष्ट्रवादीतून कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले सर्व आता कॉंग्रेसवासी झाले आहेत. परिणामी राष्ट्रवादीला सक्षम नेतृत्व नसल्याने आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही. कॉंग्रेस स्वबळावर सर्व जागा लढणार आहे. ज्यांनी १७ जागांवर दावेदारी केली आहे, त्यांचा संबंधित प्रभागांतील प्रभाव तपासला जाणार आहे. त्यानुसार उमेदवारी निश्चित केली जाणार असली तरी सर्व कॉंग्रेसवासी इच्छुकांना आपापल्या क्षमतेनुसार दावेदारी करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यामुळे २०० हुन अधिक दावेदारांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत, असे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी सांगितले.