कापडी पिशव्या वापरा अन्यथा आंदोलन

ठाणे, दि.12(वार्ताहर)-पर्यावरण संरक्षणासाठी शिवसेनेच्या लघुउद्योग विभागाने पाऊल टाकले आहे. वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीतील दुकानदार आणि व्यापार्‍यांना प्लास्टिक पिशव्या टाळून कागदी आणि कापडी पिशव्या वापरा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे. शिवसेनेच्या लघुउद्योग विभागाचे उपशहर संघटक भास्कर बैरीशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र.5 मधील शिवाईनगर आणि पवारनगर शाखेतर्फे प्लास्टिक पिशवीमुक्त अभियानाची सुरूवात रविवारपासून सुरू झाली. वर्तकनगर प्रभाग समिती हद्दीत प्लास्टिक पिशव्यांचा सर्वाधिक वापर केला जातो. या परिसरातील सर्व दुकानदार आणि व्यापार्‍यांना भास्कर बैरीशेट्टी यांनी भेट देऊन कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले. नागरिकांनाही प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नये अशी विनंती श्री.बैरीशेट्टी यांनी केली आहे. कापडी पिशव्यांची किंमत जास्त असली तरी त्याचा बोजा सर्वसामान्य जनतेवर न टाकता तो बोजा त्या त्या व्यवस्थापनाने जाहिरात निधीमध्ये सामावून घ्यावा. येत्या 15 दिवसांत कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला नाही तर ठाणे शहर शिवसेनेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशाराही श्री.बैरीशेट्टी यांनी दिला.