कल्याणात लेप्टोने घेतला दुसरा बळी !

कल्याण,दि.4(वार्ताहर)-काही दिवसापूर्वी टिटवाळ्यात एका महिलेला लेप्टोस्पायरोसिस या आजाराने जीव गमवावा लागला होता. यानंतर कल्याणात या आजाराने दुसरा बळी घेतला आहे. ज्योती यादव (14) असे या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका शास्त्रीनगर परिसरातील झोपडपट्टीत राहणारी ज्योती यादव या तरुणीला ताप आल्याने तिला उपचारासाठी डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला लेप्टोस्पायरोसिस आजार झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. यामुळे मागील आठ दिवसापासून तिच्यावर उपचार सुरु होते मात्र आज तिची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात धाडण्यात आले. तिथे तिचे निधन झाल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. दरम्यान लेप्टोस्पायरोसिस या आजाराने तिचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गुराचे गोठे, तबेले असून त्यामुळे असलेले चिखलाचे साम्राज्य, तबेल्यातील उघड्यावर फेकले जाणारे मलमूत्र, वाढलेले उंदीर, कचरा यावर वेळीच कारवाई करण्यासाठी माजी स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांनी पाठपुरावा केला होता. मात्र आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून कचरा नियमित उचलला जात नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. या घटनेनंतर तरी इतरांना या आजाराची लागण होऊ नये यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून डेंगी आणि लेप्टो प्रतिबंधक औषधाचे वाटप करण्यात आले होते. मात्र या औषधाचे सेवन करण्यास या नागरिकांकडून टाळाटाळ करण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्पष्टीकरन देण्यात आले.