कल्याणातही मंडपांवर निर्बंध

कल्याण,दि.६(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातही आता सार्वजनिक उत्सव-सण साजरे करण्यावर बंधने येणार आहेत. रस्त्यावर उभारण्यात येणारे मंडप तसेच कमानी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार उभारले जातील. पालिकेने यासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. पालिका क्षेत्रातील मंडळांनी या नियमांप्रमाणेच मंडप उभारावा अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे आयुक्त पी.वेलारसू यांनी स्पष्ट केले आहे. उशीराने का होईना पालिकेने या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली. सार्वजनिक उत्सव साजरे करतांना रहदारीस अडथळे निर्माण होणार नाहीत या अनुषंगाने डॉ.महेश बडेकर यांनी महाराष्ट्र शासन तसेच इतर यांच्याविरुध्द उच्च न्यायालयात २०१० मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्या आधारावर याचिकेच्या सुनावणीच्या वेळेस उच्च न्यायालयाने विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या जनहित याचिकेत दिलेल्या निर्देशानुसार मंडप, स्टेज किंवा कमानी उभारणीसाठी परवानगी देण्याबाबत पालिका आयुक्तांनी सविस्तर कार्यपध्दती तयार केली आहे. या कार्यपध्दतीनुसार संबंधित मंडळांना परवानगीसाठी करावयाचा अर्जाचा नमुना, विविध विभागांकडील ना हरकत दाखल्याचा नमुना तसेच परवानगी पत्राचा नमुना निश्चित केला आहे. भविष्यात कुठलाही उत्सव सुरु होण्यापूर्वी तीन आठवडे संबंधितांनी त्यांच्याशी संबंधित प्रभागक्षेत्रात मंडप परवानगीचा अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. अर्ज दाखल केल्यानंतर पोलीस, वाहतूक आणि अग्निशमन या विभागांचे दाखले एक खिडकी योजनेअंतर्गत महापालिकेकडून प्राप्त करुन घेण्यात येतील. अनुज्ञेयता पडताळून पाहिल्यानंतरच परवानगी देण्यात वा नाकारण्यात येईल. ही उत्सव सुरु होण्यापूर्वी सात दिवस अगोदर घेणे बंधनकारक असेल. मंडळाने जर रस्त्यावर खड्डे केले तर त्यांना दहा हजार रुपयांचा दंड करण्यात येईल. या गोष्टी कार्यपध्दतीत नमूद करण्यात आल्या आहेत.