कल्याणच्या महापौरांचे नगरसेवकपद रद्द

कल्याण,दि.३०(वार्ताहर)-आज कल्याण न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी होऊन देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे निर्देश दिल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अर्जुन म्हात्रे यांनी देवळेकर यांचे जात पडताळणी पत्र यापूर्वीच रद्द झाल्याचे कारण देत, याच मुद्द्यावर कल्याण न्यायालयात याचीका दाखल केली होती. दरम्यान महापौर देवळेकर यांच्या वकिलांनी या आदेशावर स्थगिती मागितली असता कल्याण न्यायालयाने उच्च न्यायालयात अपिलासाठी एक महिना मुदत दिली आहे. तर महापौर देवळेकर यांच्याशी संपर्क साधला असता कल्याण न्यायालयाने माझी निवडणूक रद्दबातल ठरवण्याचा निर्णय दिल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. परंतु त्याच न्यायालयाने या निर्णयास उच्च न्यायालयात अपील करेपर्यंत या निर्णयाला स्थगिती दिली असून उच्च न्यायालयात मला स्थगिती मिळेल असा विेशास त्यांनी व्यक्त केला.