कल्याणचा प्रणव धनावडे सीबीएसईच्या अभ्यासक्रमात!

कल्याण,दि.30(वार्ताहर)-शालेय क्रिकेट मध्ये नाबाद 1009 धावांची अविस्मरणीय खेळी करत विेशविक्रम प्रस्थापित करणार्‍या कल्याणचा प्रणव धनावडे सीबीएसई अभ्यासक्रमात दिसणार आहे. इयत्ता तिसरीच्या हिंदी पाठयपुस्तकात प्रणवच्या धडाकेबाज खेळावर आधारित ‘वाह रे हजारीलाल’ हा धडा सामील करण्यात आला आहे. कल्याणच्या वायलेनगर येथील मैदानावर 2016 साली एच टी भंडारी कप आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा झाली. या स्पर्धेत के.सी.गांधी शाळेविरुद्ध आर्य गुरुकुल शाळेची लढत होती. या लढतीत के सी गांधी शाळेकडून खेळताना प्रणव धनावडेने झुंझार खेळी करत नाबाद 1009 धावांचा डोंगर उभा केला. ही अविस्मरणीय खेळी करत प्रणवने सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विक्रम मोडीत काढले. त्याने रातोरात जागतिक क्रिकेट च्या इतिहासात नवा अध्याय रचला. त्याच्या या खेळीची दखल घेत बीसीसीआयनेही त्याला स्कॉलरशीप देऊन त्याच्या खेळाला प्रोत्साहन दिले. या नवोदित आणि होतकरू खेळाडूने गरिबीचे भांडवल न करता अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर केलेल्या चमकदार कामगिरीची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी हा संपूर्ण प्रवास सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. प्रणवचा हा धडा अभ्यासक्रमात सामील करण्यात आलेला हा धडा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. दरम्यान खुद्द प्रणवला याबाबत कुठलीही कल्पना नव्हती. त्याच्या मित्रांनी फोन करून त्याला याबाबत माहिती दिली. त्यामुळे कुटुंबीय आणि मित्रांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.आपली जबाबदारी वाढली असून भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल असे प्रणवने सांगितले.