करवसुली करून देणार्‍या डॅशिंग आधिकार्‍याची बदली!

उल्हासनगर,दि.२९(वार्ताहर)-उल्हासनगर शहरात अनधिकृत बांधकामांचा कर्दनकाळ म्हणून प्रसिध्द असलेले युवराज भदाणे यांनी मागील सात महिने मालमत्ता कराची चोरी करणार्‍यांची झोप उडवुन दिली होती. मात्र भगवंती वाईन्स या अनधिकृत बांधकामाला दंड न लावताच वसुलीची रक्कम कमी केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आणणे त्यांना महागात पडले आहे. त्यांच्याविरोधात होणार्‍या तक्रारींमुळे अखेर त्यांचा कर विभागाचा पदभार पालिका आयुक्त राजेंद्र निबांळकर यांनी काढून घेतला आहे.मात्र हा त्यांच्या वर अन्याय झाल्याची चर्चा मनपा वर्तुळात होत आहे. उल्हासनगर कॅम्प ४ येथील श्रीराम चौकात भगवंती वाईन्स या दारुच्या दुकानाची दोन माळ्यांची इमारत आहे. या दुकानाची नोंदणी दोन करपावतीच्या रूपात महापालिकेच्या कर विभागात आहे. एका करपावतीत ४०० चौरस फूट व दुसर्‍या कर पावतीत ६०० चौरस फुटाची नोंद आहे. या दोन्ही जागा मिळून दहा वर्षापूर्वी भगवंती वाईन्स हे दोन माळयांचे दुकान बनविण्यात आले आहे. या दुकानाचे एकूण क्षेत्रफळ आता ८००० चौरस फुटापेक्षा अधिक असून या दुकानाच्या तळ मजल्यावर दारूचे दुकान तर वरचा मजला जिन्स कारखान्यासाठी भाडयावर देण्यात आला असल्याची बाब समोर आल्यावर कर निर्धारक आणि संकलक युवराज भदाणे यांनी भगवंती वाईन्सचे मालक प्रितम कुकरेजा यांना अनधिकृत बांधकामाच्या शास्तीसह ७० लाख रुपयांचा कर भरण्याची नोटीस बजावली होती. दरम्यानच्या काळात भदाणे हे सुट्टीवर गेल्याने नगरसेवक भालेराव यांच्या दबावाखाली कर निरीक्षण अवघा १० लाख रुपयांचा कर भरण्याची नोटीस बजावत महापालिकेचे तब्बल ६० लाख रुपयांचे नुकसान केले होते. हे प्रकरण भदाणे यांनी समोर आणल्यानंतर महापालीका आयुक्त राजेंद्र निबांळकर यांनी भगवान भालेराव यांना नोटीस बजावत खुलासा मागितला होता. या प्रकरणानंतर भगवान भालेराव, यांच्यासह अनेक राजकरणी व सामाजिक नेत्यानी भदाणे यांच्याविरोधात तक्रार करीत त्यांचा पदभार काढून घेण्याची मागणी केली होती. भगवंती वाईन्सच्या प्रकरणात महापालीका आयुक्त निबांळकर यांनीही फक्त एकाच मालमत्तेला शास्ती लावणे चुकीचे असल्याचे सांगत या प्रकरणाचा पडदा टाकला होता. या संपुर्ण प्रकरणामुळे भदाणे यांच्याविरोधात तक्रारी वाढल्यानंतर भदाणे यांनीही कर विभागाचा पदभार काढून घेण्याची विनंती महापालीका आयुक्त राजेंद्र निबांळकर यांना केली होती. अखेर महापालीका भदाणे यांना कर विभागाच्या पदभारातुन मुक्त केले. मात्र यामुळे महापालीकेतील अधिकारी वर्गाचे मनोबल खचले आहे. तर करवसुलीतदेखिल खंड पडला आहे. उल्हासनगर महापालीकेच्या कर विभागातील कर्मचार्‍यांना लक्ष्य देऊन ते वसुल न करणार्‍या लिपीक आणि कर निरीक्षकांचा पगार कर निर्धारक आणि संकलक युवराज भदाणे यांनी थांबविला होता. यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा महापालीकेने नऊ कोटी रूपयांवर अधिक वसुली केली होती. त्याला महापालीका आयुक्त राजेंद्र निबांळकर आणि कर निर्धारक युवराज भदाणे यांची मेहनत कारणीभुत होती. मात्र भदाणे यांना पदावरून हटवत त्यांच्या जागी आलेले संतोष जाधव कशाप्रकारे कर्मचा-यांकडून काम करून घेत मालमत्ता करवसुलीचे २८७ कोटी रूपयांचे लक्ष्य कसे मिळवतात याकडे सगळयांचे लागले आहे.