कडक उन्हामुळे अंबरनाथला रूळही वाकले; वाहतूक विस्कळीत

अंबरनाथ, दि.२७(वार्ताहर)-गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानामध्ये झालेल्या वाढीच्या फटक्याची झळ रेल्वेलाही बसली आहे आज दुपारी पडलेल्या कडक उन्हामुळे रूळ वाकल्याचा प्रकार घडल्याने रेल्वे वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती. गेल्या दोन दिवसापासून कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. याचा फटका रेल्वे रुळाला बसल्याने २७ मार्च रोजी दुपारी २ वाजता अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान चिखलोली रेल्वे फाटकाजवळ उन्हामुळे रूळ दुभंगल्याचे दिसून आले होते. अचानक झालेला प्रकार रेल्वे कर्मचार्‍यांच्या लक्षात आला आणि रेल्वे यंत्रणा कामाला लागली आणि सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास रेल वाहतूक पूर्ववत सुरु आली. या प्रकारामुळे गाड्यांची रांग लागली होती.