उल्हासनगर पालिकेतील पाच गटनेत्यांच्या दालनांना कुलूप ठोकले

उल्हासनगर,दि.५(वार्ताहर)-कोणतीही सुचना न देता उल्हासनगर पालिकेतील राष्ट्रवादी, कॉंग्रेस, आठवले गट, पीआरपी, भारिप बहुजन महासंघ या पक्षाच्या पाच गटनेत्यांच्या दालनांना कुलूप ठोकण्यात आल्याने हे गटनेते संतप्त झाले आहेत.या दालनांचा चेंडू आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या हाती असून परवा ते या दालनां बाबत निर्णय घेणार आहेत. दालनांचा प्रशासकीय आदेशाशिवाय परस्पर अनधिकृतपणे ताबा घेणे असा ठपका या गटनेत्यांवर ठेवण्यात आला आहे. याशिवाय वरील गटनेत्यांची सदस्यसंख्या ही एकूण सदस्यसंख्येच्या एक दशांशपेक्षाही म्हणजेच १० टक्के पेक्षाही कमी आहे. त्यामुळे महासभेत दालन वाटपासंबंधी धोरणात्मक निर्णय होईपर्यंत दालने काढून घेण्यात आल्याचे आदेश आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी जारी केले आहेत. पहिल्या मजल्यावर भारत गंगोत्री-राष्ट्रवादी, अंजली साळवे-कॉंग्रेस, भगवान भालेराव-आठवले गट, प्रमोद टाले-पीआरपी, कविता बागुल-भारिप बहुजन महासंघ या पाच गटनेत्यांची दालने आहेत.त्यांच्या नावाचे नामफलक पालिकेनेच बनवून दिले होते. गेल्या तीन महिन्यापासून ही दालने गटनेत्यांकरवी वापरली जात होती. दालनांना कोणतीही सूचना न देता कुलूप लावल्याने संतप्त झालेले भगवान भालेराव, रोहित साळवे, सुधीर बागुल यांनी पत्रकार कक्षात येऊन पालिकेने केलेल्या दुजाभावबद्दल नाराजी व्यक्त केली.यापूर्वी देखील एक,दोन नगरसेवक असलेल्या पक्षाला गटनेत्यांची दालने दिली गेली.मग आताच आमच्यावर अन्याय कशाला असा सवाल उपस्थित केला. आयुक्त निंबाळकर यांनी दोन दिवस रजेवर असून ते आल्यावर याबाबत विचारणा करणार असल्याचे सांगितले.