आजपासून संस्कृती आर्टस् फेस्टिव्हल

ठाणे,दि.11(वार्ताहर)-विहंग टाइम्स संस्कृती आर्टस फेस्टिवल या कलामहोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष असून 12 ते 15 जानेवारीपर्यंत हा कलामहोत्सव रंगणार आहे. या कलामहोत्सवाचा आस्वाद पोखरण येथील उपवन या निसर्गसुंदर ठिकाणी ठाणेकर सकाळपासून रात्रीपर्यंत घेऊ शकणार आहेत. संगीत, नृत्य, शिल्प, चित्रकला, लोकसंगीत या क्षेत्रातील दिग्गज तसेच विदेशातील नामवंत कलाकारांनी गेल्या तीन वर्षात या कलामहोत्सवाला जगभरात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. यावर्षीही देशविदेशातील 600 हून अधिक दिग्गज कलाकार आपली कला खुल्या नभांगणात सादर करणार आहेत. या चौथ्या वर्षातही लाखो कलारसिकांना देशाच्या विविधरंगी कला संस्कृतीचे दर्शन, विविध कलांच्या माध्यमातून घडणार आहे. विविध कलांचे एकत्र गुंफण, चित्रप्रदर्शनी शिल्पकलांचे पाककलांचे प्रत्यक्ष सादरीकरण हे यावर्षीचे विशेष आकर्षण असणार आहे. या संस्कृती आर्टस फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष आ.प्रताप सरनाईक, उपाध्यक्ष अरुणकुमार सुवर्ण, सचिव मनोज पिल्लई, कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, उपसचिव सुमन विजयकर, खजिनदार राजीव मुंदडा आणि स्नेहल रावले. भारताच्या विविधरंगी कला संस्कृतीचा अविष्कार टाइम्स संस्कृती आर्ट फेस्टिवल प्रताप सरनाईक फाऊंडेशन, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या आर्थिक सहकार्याने ठाण्याच्या उपवन तलावाच्या सान्निध्यात रंगणार आहे.