आघाडीच्या पंगतीत मनसेला पाट नाहीच

ठाणे,दि.5(वार्ताहर)-काँगेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेण्याचा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादी पक्षाने ठेवला नाही. तशी कुठलीही बोलणी राष्ट्रवादीने मनसेबरोबर केली नसल्याचा स्पष्ट निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल दिला. ठाणे शहर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी पुन्हा आनंद परांजपे यांची निवड झाल्याने त्या निमित्ताने ठाण्यातील टिप टॉप प्लाझा येथे एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला आमदार जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक, शहर अध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, सचिव सुहास देसाई, ठामपा विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना आपले मत व्यक्त केले. मनसेला महाआघाडीत घेण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे का? असा सवाल त्यांना केला असता, तसा कोणत्याही स्वरुपाचा प्रस्तावच नसल्याचे स्पष्ट केले. भारीप आणि एमआयएमच्या झालेल्या चर्चेबाबतही तो त्यांचा निर्णय आहे त्यांनी काय भाषणे केली यात न पडता समविचारी पक्षांना सोबत घेऊन आम्हाला शिवसेना, भाजपाला सत्तेपासून दूर न्यायचे आहे. प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष आमच्या समविचारी पक्षांच्या व्याख्येत बसतो. भाजपा आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ते आमच्या बरोबर येतील. त्यांनी बाहेर काही वक्तव्य केले असले तरी आम्ही भाजपा आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा सुरु केली असल्याचेही स्पष्ट केले. महाआघाडीत जे जे समविचारी पक्ष येतील त्यांना आम्ही सोबत घेऊन जाऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. जर मतांचे विभाजन करुन अप्रत्यक्षपणे कोणाला शिवसेना भाजपाला मदत करायची असेल तर हा निर्णय त्यांचा असेल असेही त्यांनी भारीपचे नाव न घेता आरोप केला. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी भाजपाला राज्य गहाण टाकण्याची वेळच कशी येते असा सवालही त्यांनी उपस्थित करीत राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असाच त्याचा अर्थ होऊ शकतो असाही टोला त्यांनी लगावला. राज्याच्या जनतेवर या सरकारने पाच लाख कोटींच्या कर्जाचा बोजा टाकला आहे. बाबासाहेबांचे स्मारक बांधायचे होते तर ते चार वर्षात का बांधले गेले नाही, आता केवळ खर्चाची बाब वाढल्याचे सांगून केवळ नाचता येईना अंगण वाकडे अशीच परिस्थितीत या सरकारची झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. केवळ एका वर्षात समृध्दी महामार्गाचा खर्च वाढला आहे, एका व्यक्तीसाठी 800 कोटींची नुकसान भरपाई देण्याचा पराक्रम याच सरकारने केला आहे. त्यामुळेच हा खर्च वाढत चालला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पेट्रोल, डिझेलचे दर पाच रुपयांनी कमी केले असले तरी वास्तविक आधीच 20 ते 25 रुपयांची दरवाढ या सरकाराने करुन ठेवली असल्याने त्यांनी काही सामान्य जनतेवर उपकार केलेले नाहीत,
असेही श्री.पाटील म्हणाले.