अवजड प्रश्‍न हलका होणार!

ठाणे,दि.11-मुंब्रा बायपास येथील उड्डाणपूलासह ठाण्यातील अनेक पूल धोकादायक ठरल्याने या पुलावरील भार हलका करण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर ठाण्यात अवजड वाहनांना सम-विषम तारखेला आलटून पालटून प्रवेश देण्याचा विचार वाहतूक शाखेचे पोलीस करत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील अनेक पुलांची स्थिती धोकादायक निर्माण झाली आहे. मुंब्रा बायपास मार्गाने अवजड वाहनांची जवाहरलाल नेहरू पोर्टट्रस्ट येथे ये जा सुरू असते. या मार्गावरील उड्डाणपूल कमकुवत झाला आहे. त्याची बेरींग तुटली आहे. तो पूल अतिधोकादायक झाला असून तेथे कधीही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोपरी पूल अरूंद तसेच धोकादायक झाला आहे. खारेगाव येथील खाडीपुलावरून देखील मोठ्या प्रमााणत अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहनांचा भार सोसावा लागत आहे. त्यामुळे शहरात तसेच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्यामुळे पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांच्यासह पोलीस आयुकत मकरंद पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी रस्त्यावरील भार कमी करण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर सम विषम तारखांना वाहनांना त्या त्या तारखांना शहरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अवजड वाहनांची संख्या निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील वाहनांचे प्रदूषण देखील कमी होण्याचा विश्‍वास वाहतूक शाखेच्या पोलिसांनी व्यक्त केला आहे. या निर्णयाची अधिसूचना एक ते दोन दिवसात प्रसिध्द केल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात दिवसाला किमान 50 ते 60 हजार अवजड वाहनांची येजा असते. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर शहरात अवजड वाहनांची संख्या निम्म्यावर येणार असल्याचा विश्‍वास वाहतूक शाखेतील पोलिसांनी व्यक्त केला आहे.