अन्यथा वॉटर फ्रन्ट होऊ देणार नाही!

ठाणे,दि.१५(वार्ताहर)-भिवंडी आणि घोडबंदर-कासारवडवली परिसरातील गावांमधील भूमिपुत्रांना विश्‍वासात घेतल्याशिवाय वॉटर फ्रन्ट विकास करु देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांच्या संघटनेने दिला आहे. या योजनेत बाधित होणार्‍या गावांमधील भूमिपुत्रांची १४ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेणयात आला. त्यामुळे या प्रकल्पावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीचा भाग म्हणून ठाण्यातील खाड्यांचे ‘वाटॅर फ्रंट डेव्हलपमेंट’ प्रोजेक्ट अंतर्गत सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पण या प्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना स्थानिकांच्या सूचनांचा विचार केला जावा यावर चर्चा करण्यासाठी एक सभा १४ एप्रिल रोजी कासारवडवली येथील राम मंदिरात पार पडली. सभेसाठी वाघबीळ, गायमुख, भाईंदरपाडा, ओवळा, कासारवडवली, मोघरपाडा, कोळीवाडा, भिवंडी परिसरातील भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले अनेक वर्ष ठाण्यातील आगरी- कोळी समाज खाडीकिनारी मासेमारी व पारंपारिक डूबी पद्धतीने वाळू-रेतीउत्खनन करत असत. पण गेल्या चार वर्षापासून रेती व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. रेती व्यवसायासाठी रेतीव्यावसायिक खूपवर्षा पासून खाडीकिनारील जागेचे भाडे मेरीटाईम-कस्टमबोर्डकडे भरत होते. त्याच्या पावत्यासुद्धा या रेती व्यावसायिकांकडे आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना विचारात न घेता खाड्यांचे सुशोभीकरण होत आहे त्याबद्दल भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी आहे. भूमिपुत्रांचा विकासाला विरोध नाही पण त्या विकासामध्ये त्यांना सुद्धा वाटेकरू करून घेतले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’प्रकल्प राबवत असताना उपलब्ध होणार्‍या उद्योग-धंद्यात रोजगारात स्थानिकांनाच प्राधान्यदिले पाहिजे व भविष्यात रेती व्यवसाय सुरू झाल्यास त्याकरीता आताच भूखंड राखून ठेवले पाहिजेत या भूमिपुत्रांच्या प्रमुख मागण्या आहेत असे सागर पाटील यांनी सांगितले. या विषयी सर्व लोकप्रतिनिधीं संबंधित अधिकार्‍यांना निवेदन देणार आहोत आणि जोपर्यंत हमी मिळणार नाही तोपर्यंत ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’प्रकल्पाचे काम सुरु होऊ देणार नाही असे भूमिपुत्रांनी ठरवले. ठाण्यातील भूमिपुत्र आत स्वतःच्याच परिसरात उपरा ठरू लागला आहे असे मत उपस्थितांनी मांडले. ठाण्याचा मूळ समाज असलेला आगरी-कोळी-आदिवासी समाज आज अनेक समस्यांना तोंड देत आहे. या विषयी गावोगावी जन जागृती करण्याचे काम सुरू आहे आणि येणार्‍या दिवसात आमच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे मत सागर पाटील यांनी मांडले. यावेळी अरुण पाटील, अविनाश राऊत, राजेंद्र पाटील, जनार्दन पाटील, लिलाधर मणेरा आदींनी मार्गदर्शन केले. तर किरण पाटील, प्रितेश पाटील, केतन घरत, समिर चौधरी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.