अतिक्रमणे तोडायला गेलेल्या पथकावर हल्ला

नवी मुंबई,दि.५(वार्ताहर)-कोपरखैरणे रेल्वे स्थानकाशेजारील जागेवरील अधिकृत झोपड्यांवर कारवाई करायला गेलेल्या सिडकोच्या पथकावर आणि पोलीस कर्मचार्‍यांवर येथील झोपडीधारकांनी दगडफेक केली, त्यात चार पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले असून इतर सहा ते सात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. कोपरेखैरणे रेल्वे स्थानकाशेजारी सिडकोच्या मालकीचे भुखंड आहेत .त्या भुखंडावर ४०० च्या आसपास अनधिकृत झोपड्या उभ्या होत्या. या झोपडीधारकांना सिडकोने नोटिसा दिल्या होत्या. तरी पण या झोपड्या हटविण्यात आल्या नव्हत्या.शेवटी मंगळवार ५ जून रोजी सिडको कोपरखैरणे पोलीस ठाण्यातून पुरेसे पोलीस कर्मचारी घेऊन या गेले असता जवळ पास ४०० ते ५०० लोकांच्या जमावाने झोपड्या तोडण्यास विरोध केला. मात्र सिडकोतर्फे कारवाई सुरु असताना संतप्त जमावाने पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटी यांच्या डोक्याला गंभीर दुखावत झाली असून त्यांचे इतर कर्मचारी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल गवळी, उपनिरीक्षक चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल कडूबा जोशी जखमी झाले. त्यांच्यावर कोपरखैरणेतील महावीर इस्पितळात उपचार सुरू असून इतर सहा ते सात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. दगडफेक झाल्यानंतर पोलिसांकडून अधिक कुमक मागवीण्यात आली आणि संतप्त जमावावर पोलिसांकडून सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. तर जमावाला पांगवण्यात आल्यानंतर सर्व अनधिकृत झोपड्या तोडण्यात आल्या आणि सिडकोतर्फे लागलीच त्या जागेवर कुंपण घालण्यात आले. मात्र कारवाई दरम्यान झालेल्या दगडफेकीमुळे कोपरखैरणे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती पहावयास मिळाली. दगडफेक करणार्‍या नागरिकांची धरपकड सुरू असून त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे व सरकारी कर्मचार्‍यांवर दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक डॉ.सुधाकर पाठरे यांनी सांगितले.