अंबर भरारीच्या तिसर्‍या मराठी चित्रपट महोत्सवात २५ चित्रपटांचा समावेश

अंबरनाथ,दि.५(वार्ताहर)- मुंबईच्या चंदेरी दुनियेत मोठ्या थाटामाटात हिंदी, मराठी चित्रपट महोत्सव साजरे होतात, मात्र ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथसारख्या छोट्या उपनगरातील पहिला चित्रपट महोत्सव म्हणून सिनेरसिक आणि कलावंतांमध्ये कौतुकाचा विषय ठरलेल्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाला यंदा तिसर्‍या वर्षीही भरघोस प्रतिसाद मिळाला आहे, २५ चित्रपट आणि ५० लघुपटांचा समावेश असलेल्या या महोत्सवतात कॉपी, पेज-४, सर्वनाम, गडबड गोंधळ आणि कलाकेंद्र या चित्रपटांनी नामांकनामध्ये बाजी मारली आहे. ‘अंबर भरारी’ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि शहरातील इतर संस्थांच्या मदतीने दोन वर्षांच्या भरघोस प्रतिसादानंतर यंदा सलग तिसर्‍या वर्षीही मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील आनंदनगर आद्योगिक वसाहतीमधील ‘आमा’ संस्थेच्या सभागृहात महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. चित्रपट विभागात विविध गटात ४३ तर लघुपट विभागात २० पुरस्कार दिले जाणार आहेत. २१ ऑक्टोबरला योगेश सोमण यांच्या ‘माझं भिरंभिरं’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरूवात तर ३० ऑक्टोबर रोजी गिरीश मोहिते यांच्या ‘सर्वनाम’ चित्रपटाने महोत्सवाची सांगता झाली. नातवंड, मुंबई किनारा, सॉरी, रायरंद, नॉट अ ब्रेकिंग न्यूज, हॅप्पी बर्थ डे टु यू, नरया, धुमा, खोपा, प्रतिभा, वाक्या, बाळ भीमराव, ब्रेव्हहार्ट, गणू, ट्रकर आदी चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आले. अंबर भरारी संस्थेचे संस्थापक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, निखील चौधरी आदींनी महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा अभिनय असलेला प्रदर्शित होणारा शेवटचा चित्रपट ‘गडबड गोंधळ’ही या महोत्सवात दाखविण्यात आला. त्यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात विशेष स्मृती सन्मान पुरस्कार दिला जाणार आहे तसेच सिने पत्रकार म्हणून यंदा दिलीप ठाकुर यांना सर्वोत्कृष्ट सिने पत्रकार पुरस्कार दिला जाणार आहे चित्रपट लेखक, दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी महोत्सवाचे दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली. महोत्सव समितीतील जगदिश हडप, गिरीश पंडित, अभय शिंदे, अनिल कवठेकर, डॉ. राहुल चौधरी यांनी चित्रपटांचे परीक्षण केले. तिसर्‍या मराठी चित्रपट महोत्सवाची सांगता विविध दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमध्ये पारितोषिक वितरण सोहळा रविवार, २६ नोव्हेंबर रोजी गावदेवी मैेदान, अंबरनाथ (पूर्व) येथे केले जाणार आहे. ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांना मागील वर्षी अंबर भरारीचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.