अंबरनाथ-बदलापूरमध्ये सेनेचे नगराध्यक्ष बिनविरोध

अंबरनाथ,दि.२१(वार्ताहर)- अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेत शिवसेनेचेच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. अंबरनाथमध्ये सेना-भाजपाची युती पहायला मिळाली परंतु बदलापूरमध्ये युती तुटल्याचे स्पष्ट झाले. पुढील वर्षासाठी नगराध्यक्ष आणि उप नगराध्यक्षपदासाठी कल्याणचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आज निवडणूक झाली. शिवसेनेच्या मनिषा वाळेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी शनिवारी राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि मनसे या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याने शिवसेना शहरप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या पत्नी मनिषा वाळेकर यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. केवळ औपचारिक घोषणा बाकी होती. नगराध्यक्ष पदासाठी अन्य उमेदवारी अर्ज न आल्याने पीठासीन अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी सौ.वाळेकर यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे आज जाहीर केले. त्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. या पदासाठी देखील शिवसेनेच्या अब्दुल शेख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने श्री.शेख यांची उप नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर नगरसेवक आणि शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. पीठासीन अधिकारी उकर्डे आणि मुख्याधिकारी देविदास पवार यांनी नगराध्यक्ष आणि उप नगराध्यक्ष यांचे अभिनंदन केले. कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आ.डॉ.बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी नगराध्यक्षा वाळेकर आणि उप नगराध्यक्ष अब्दुल शेख यांचे अभिनंदन केले. शहराच्या विकासकामाच्या मुद्यावर सर्व राजकीय पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे, सर्वाना एकत्र घेऊन शहर विकास करणार, सगळे पक्ष एकत्र आल्याचे अंबरनाथ नगरपालिकेतच पहायला मिळाले, अशी प्रतिक्रीया खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिली. सगळे राजकीय पक्ष शिवसेनेसोबत आले आहेत, ही चांगली बाब आहे, शिवसेना शहराचा सर्वांगीण विकास करेल, असे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी ठाणेवैभवशी बोलताना सांगितले.