अंबरनाथच्या प्रवाशांना जागा द्या अन्यथा...

अंबरनाथ,दि.21(वार्ताहर)- अंबरनाथ येथून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला सुटणार्‍या लोकलमध्ये अंबरनाथच्या प्रवाशांना प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे उल्हासनगरहुन रिटर्न येणार्‍या प्रवाशांनी सौजन्य दाखवावे नाहीतर गांधीगिरी करून प्रवाशांना विनंती केली जाईल. यात सुधारणा झाली नाही तर मनसे स्टाईलने अशा प्रवाश्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्रवाशांना भेडसावणार्‍या समस्या आणि चुकीच्या जागी बांधण्यात आलेल्या सरकत्या जिन्याचा जाब विचारण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंगळवारी अंबरनाथ रेल्वे स्थानकाला धडक दिली. आणि स्थानक प्रमुख विजय वानखेडे यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रवाशांना न्याय मिळाला नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मनसे जिल्हा संघटक संदीप लकडे, युसूफ शेख, नगरसेविका अपर्णा भोईर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंबरनाथ शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत अंबरनाथ येथून सीएसटीला जाणार्‍या लोकलची संख्या अपुरी आहे. यातच सीएसटीकडून अंबरनाथला येणार्‍या लोकलमध्ये विठलवाडी, उल्हासनगर येथून पुरुष आणि महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे. यामुळे अंबरनाथ येथून लोकल पकडून कामावर जाणार्‍या प्रवाशांना नाईलाजाने उभे राहून प्रवास करावा लागतो. याबाबत काही महिला प्रवाशांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे उल्हासनगर येथून अंबरनाथला येणार्‍या प्रवाशांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात उतरून पुन्हा लोकल पकडावी यासाठी रेल्वे प्रशासनाने कार्यवाही करावी, 1 सप्टेंबर रोजी अशा रिटर्न येणार्‍या प्रवाशांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला जाईल आणि समजावून सांगितले जाईल. 15 दिवसांची मुदत दिली जाईल आणि त्यात फरक पडला नाही तर अशा प्रवाशांना मनसे स्टाईलने गाडीतून उतरवले जाईल, असा इशारा श्री.भोईर यांनी स्थानकप्रमुखांना दिला. याशिवाय रेल्वे स्थानकात बसवण्यात आलेला सरकत्या जिन्याची जागा चुकीची असून रेल्वेच्या प्रवाश्यांच्या सोयीसाठी तो फलाट एक ते तीनला जोडावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबाबत कळवण्यात येईल, स्टेशन अधीक्षक विजय वानखेडे यांनी सांगितले.