अंबरनाथच्या तुषार भोईरची प्रो कबड्डीमध्ये जोरदार मुसंडी

अंबरनाथ,दि.२७(वार्ताहर)-घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव येथील तुषार भोईर याने प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये दबंग दिल्ली संघात मुसंडी मारली आहे. लहानपणापासूनच कबड्डीची आवड असलेल्या तुषार याने कबड्डी खेळातच नाव कमवायचे ही जिद्द ठेवली आणि त्याने कबड्डी खेळावरच आपले लक्ष केंद्रीत केले. लाल मातीच्या मैदानात कबड्डी खेळणार्‍या तुषारने कबड्डीच्या वेडापोटी मॅटवरील कबड्डीवर लक्ष केंद्रीत केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅटवरच कबड्डीचे सामने होत असल्याने मॅटवर कबड्डीचा सराव सुरू केल्याचे तुषार भोईर म्हणाला. संपूर्ण अंबरनाथ तालुक्यात मॅटवरील कबड्डीचा सराव करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र किंवा संघ नसल्याने कल्याणच्या शिवशंकर कबड्डी संघाकडे धाव घेतली. या संघात मॅटवरील नियमित सराव सुरू केला. कल्याणच्या शिवशंकर संघातून खेळतांना राज्य पातळीवर सर्वेत्कृष्ट कामगिरी बजावली. कबड्डीमध्ये कुमार गटाचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असतानाच. प्रो कबड्डी स्पर्धेतील दिल्ली दबंग संघाकडून खेळाडूंची निवड करण्यासाठी वडाळा येथे शिबीर घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आणि या शिबिरात प्रवेश मिळवला आणि चाचणीत चांगली कामगिरी बजावली अशी आठवण तुषार भोईर याने सांगितली. निवड चाचणीत बचाव फळीत खेळतांना माझा खेळ पाहुन दबंग दिल्ली संघाने निवड केली आहे. दोन वर्षासाठी दिल्ली दबंग संघातून तुषार भोईर कबड्डीमधील प्राविण्य दाखवणार आहे. तुषार याचे शालेय शिक्षण हे आंबेशिव या गावात झाले. तुषारने कबड्डीमधील आपले गुरुस्थान हे कल्याणचे यशवंत यादव आणि कोल्हापुरचे रमेश भेंडीगिरे यांना गुरूस्थानी मानणार्‍या तुषार भोईर याचे शालेय शिक्षण आंबेशिव गावीच झाले आहे. कबड्डी खेळामधील उत्कृष्ट पकडी आणि चाल शिकवण्यात शिवशंकर क्रीडा मंडळाचे महत्वाचे योगदान आहे, महा कबड्डी लीगमध्ये चमकदार कामगिरी दाखवणारा तुषार आता प्रो कबड्डीत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर खेळ कसा उंचावता येईल याकडे केंद्रीत केले आहे असे तुषार भोईर म्हणाला.