धो डाला!

ठाणे,दि.12(वार्ताहर)-शहरात वाढत असलेल्या धुलीकणांमुळे होणार्‍या त्रासातून ठाणेकरांची सुटका होण्याची शक्यता असून ठाणे महापालिकेने शहरातील रस्ते पाण्याचे धुण्याचा निर्णय घेतला असून कालपासून त्याची सुरूवात झाली आहे. महापालिका हद्दीतील रस्ते पाण्याने धुण्याचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर करण्यात आला होता. पाच वर्षांकरिता शहरातील रस्ते पाण्याने धुण्याचा ठेका देण्यात आला आहे. या कामांतर्गत रस्त्याचे दुभाजक, कपस्टोन आणि रस्ते पाण्याने धुण्यात येणार आहेत. महापालिका हद्दीतील काही रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे तर काही रस्ते युटीडब्ल्यूटी आणि डांबरी आहेत. या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली असते. वार्‍याबरोबर ही धूळ रस्त्यवर येते, हवेत धुळीचे कण जातात त्यामुळे ठाणेकरांना श्‍वसनाचे आजार होतात. शहरातील मुख्य चौकात धुलीकणांमुळे वायुप्रदूषणात वाढ झाली आहे. ती रोखण्यासाठी धूळ शोषून घेणारी यंत्रे देखील महापालिकेने चौका चौकात लावली आहेत. तरीही अनेक रस्त्यावर धूळ दिसते त्याचबरोबर धुळीमुळे दुभाजक आणि कपस्टोन देखील घाण होतात. त्याची साफसफाई केली जाणार आहे. जेटींग मशिनच्या सहाय्याने ही साफसफाई केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्याचे दुभाजक आणि कपस्टोन तसेच रस्ते चकाचक दिसणार आहेत. महापालिकेने काल रात्री रेमंड कंपनी समोरील रस्त्याची पाण्याने साफसफाई केली. त्यामुळे हा रस्ता चकाचक दिसत असल्याचे नगर अभियंता अनिल पाटील यांनी सांगितले. शहरातील रस्ते धुण्याकरिता तलाव तसेच मलनिस्सारणापासून पुनर्निर्मिती केलेल्या पाण्याने हे रस्ते धुतले जात आहेत. हे पाणी नाल्यात किंवा खाडीला सोडले जाते त्या पाण्याचा या साफसफाईसाठी वापर केला जाणार असल्याचे श्री.पाटील म्हणाले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून रस्त्याची पाण्याने साफसफाई केली जाणार आहे. अनेक शहरात अशा प्रकारे रस्ते धुतले जातात. परंतु ठामपात मात्र वेगवेगळ्या प्रकारे कमी वेळात आणि जास्त जलदगतीने रस्ते धुतले जातील असेहीश्री. पाटील म्हणाले.